महाराष्ट्र

Sharad Pawar : खामगावच्या तहसील कार्यालयात ‘शरद पवार हाजीर हो…’, पण का?

Minor Mineral Mining : अवैध गौण खनिज उत्खननाचे हे प्रकरण आहे.

Buldhana News : ‘शरद पवार हाजीर हो..’, हे वाचून अनेकांच्या भुवया उंचावणे स्वाभाविक आहे. सध्याच्या राजकारणात सुरु असलेली उलथापालथ आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्यांत न्यायालय, आयोग आणि पोलिसांत सध्या असे पुकारे होणे सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र ‘शरद पवार हाजीर हो…’, असा पुकारा बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या तहसील कार्यालयातून होणे, हा विषय अनेकांना दचकवून सोडणारा आहे.

खामगाव तहसीलदार यांच्याकडून नोटीस मिळालेले हे महाशय शरद पवारच आहेत. मात्र ते राजकारणी ‘बारामतीकर’ नसून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या टेंभुर्णा येथील रहिवासी आहेत. हे शरद पवार खाण मालक आहेत. अवैध गौण खनिज उत्खननाचे हे प्रकरण आहे. एका गटाची गौण खनिज उत्खननाची परवानगी घेऊन दुसऱ्याच गटातील उत्खनन केल्याचे हे प्रकरण आहे. या प्रकरणात तहसीलदारांकडून त्यांना ‘हाजीर हो…’ची नोटीस बजावणीत आली आहे.

खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा येथील एका जागेसाठी गौण खनिज उत्खननाची परवानगी घेऊन, दुसऱ्याच जागेवर उत्खनन करण्यात आले. त्यामुळे नियमाचा भंग झाल्याने खामगावचे तहसीलदार अतुल पाटोळे यांनी खाण मालक शरद पवार यांना नोटीस बजावून काल (ता. 31 मे) रोजी समक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते. गट नंबर (90) हा शरद पवार (रा. टेंभुर्णा) यांच्या मालकीचा आहे.

Hit and Run Case : पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईलाही अटक !

गट नंबर (90) मधून गौण खनिज उत्खननाची परवानगी काढून त्यांनी खाणकाम क्षेत्रात समाविष्ट नसलेल्या लगतच्या गट नंबर (91)मध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या गौण खनिज उत्खनन करून महसूल बुडवला. शासनाचे मोठे नुकसान केले आहे. याप्रकरणी जिल्हा खनिकर्म विभागाकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर चौकशी करून, गौण खनिज उत्खननाचे मोजमाप करून महसूल वसूल करावा, असा आदेश देण्यात आला आहे.

तहसीलदार पाटोळे यांच्या आदेशान्वये अवैधरीत्या उत्खनन व वाहतूक केल्याबाबतच्या रॉयल्टी पावत्या तसे उत्खननाबाबतची संबंधित कागदपत्रे व लेखी खुलासासह 31 मे रोजी तहसील कार्यालयात उपस्थित राहावे, असे नमूद केले होते. याबाबतचा खुलासा मुदतीमध्ये सादर न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असा इशाराही तहसीलदारांनी आपल्या नोटिशीमध्ये दिला आहे. तहसीलदारांनी बजावलेल्या या नोटीसची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांमध्ये खमंग चर्चा रंगली आहे. शिवाय, हे शरद पवार नेमके आहे तरी कोण, हे जाणून घेण्याची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!