Nashik City : नाशिकमध्ये एका सराफा व्यावसायिकाशी संबंधित मालमत्तांवर प्राप्तीकर विभागाने छापा मारला. यात 26 कोटींची रोकड आणि 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त केले आहेत. प्राप्तीकर विभागाच्या या कारवाईमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईसाठी नाशिक, नागपूर आणि जळगावचे अधिकारी एकत्र आले होते.
राज्यातील बडे व्यावसायिक आणि सराफा व्यापारी सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. दोन तीन दिवसांपासून आयकर विभागाचे अधिकारी राज्यात ठिकठिकाणी छापे टाकत आहेत. यामध्ये अनेकांकडे बेहिशेबी मालमत्ता सापडत आहेत. काल रात्री नाशिकमध्ये आयकर विभागाने अचानक छापा टाकला. केली. बड्या सराफा व्यावसायिकाकडे कोट्यवधींच घबाड आढळून आलं. सराफा व्यावसायिकाने बंगल्यातील फर्निचर तसेच प्लायवूडच्या आत कोट्यवधींची रक्कम लपवून ठेवली होती.
50 अधिका-यांची एकाच वेळी कारवाई
नाशिक, नागपूर आणि जळगावच्या 50 अधिकाऱ्यांनी एकाच वेळी कारवाई केली. सलग 30 तास सुरू असलेल्या या कारवाईमुळे शहरातील बड्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
कारवाईला लागले 30 तास
आयकर अधिकाऱ्यांनी 26 कोटींची रोकड जप्त केली. जप्त केलेली रक्कम मोजण्यासाठी या अधिकाऱ्यांना 14 तास लागले. सलग 30 तास कारवाई सुरू होती. 50 ते 55 अधिकाऱ्यांनी सुराणा ज्वेलर्स यांची पेढी तसेच त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात छापा सत्र सुरू केले होते. त्याचवेळी त्यांच्या राका कॉलनीतील आलिशान बंगल्यात देखील स्वतंत्र पथकाने तपासणी सुरू केली होती. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेली त्यांची कार्यालये, खासगी लॉकर्स व बँकांमधील लॉकर्सही तपासण्यात आले. मनमाड व नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी करण्यात आली.