BJP News : उबाठाचे अधिकृत आणि शरद पवार गटाचे स्वयंघोषित प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पुन्हा अकलेचे तारे तोडत भाजपच्या अंतर्गत राजकारणावर रोखठोक मध्ये भाष्य केले. राऊत हे उद्धव ठाकरे यांचे कर्मचारी आहेत पण ते शरद पवार यांची चाकरी करतात. ते भ्रमिष्ट अवस्थेत ‘रोखठोक‘ लिहित असावेत. भाजप हा पक्ष नाही तर परिवार आहे. ज्यांनी आयुष्यभर गटातटाचे राजकारण केले त्या संजय राऊतांना परिवार काय कळणार? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांना केला. एक्सवर ट्विट करताना त्यांनी संताप व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, योगीजी, नितीनजी, देवेंद्रजी हे भाजपच्या एकाच परिवारातील सदस्य आहेत. प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या ध्येयाने भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता काम करतो. पण संजय राऊतांच्या बाबतीत प्रथम शरद पवार नंतर स्वतः, शेवटी उद्धव ठाकरे आणि उबाठा गट असा क्रम आहे. त्यामुळे राऊतांच्या डोक्यातून असेच काहीतरी बाहेर पडणार.
त्यावरही रोखठोक येऊ द्या
2019 मध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी संजय राऊत यांनी देखील प्रयत्न केले होते. पण त्यांचा डाव फसला. हिंमत असेल तर एक ‘ रोखठोक‘ त्यावरही येऊ द्या! असे आव्हान बावनकुळे यांनी दिले. संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत राजकारणात लुडबुड करण्याची काहीही आवश्यकता नाही असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.