Voting : बुलढाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघात भारत निवडणूक आयोगाने सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदानाची वेळ निश्चित केली होती. त्यानुसार 20 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजतापासूनच मतदारसंघात मतदानाला उत्साहात सुरुवात झाले. मतदारांनी मतदानाची टक्केवारी वाढवून शासकीय जनजागृतीला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद देत सातही मतदारसंघात प्राप्त आकडेवारीनुसार सरासरी 70.32 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत बुलढाणा जिल्ह्यात १३ लाख ४१ हजार ३७२ मतदारांनी मतदान केले होते. त्यामध्ये ६ लाख ७८ हजार ६५ पुरुष तर ६ लाख ६३ हजार २९२ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी मतदान केंद्रांमध्ये गर्दी कमी होती; परंतु दुपारपासून वाढ झाली. सातही विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६२.८४ टक्के मतदान झाले होते. सातही विधानसभा मतदारसंघात ११५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्याचे भाग्य आता मतदान यंत्रात बंद झाले आहे.
मतदान निर्भय, पारदर्शक निपक्षपातीपणे व्हावे, यासाठी जिल्ह्यात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. १५ हजार अधिकारी, कर्मचारी ही मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी नियुक्त करण्यात आले होते. २०१९ च्या निवडणुकीमध्ये १२ लाख १ हजार ११९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्या तुलनेत यावर्षी मतदान करणा-यांच्या संख्येत १ लाख ४० हजार २५३ संख्येने वाढ झाली आहे. परिणामी मतांची अंतिम आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे
विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान
मलकापूर विधानसभा मतदारसंघात 70.75, बुलढाणा विधानसभा मतदारसंघात 62.15, चिखली विधानसभा मतदारसंघात 71.68, सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात 70.05, मेहकर विधानसभा मतदारसंघात 68.80, खामगांव विधानसभा मतदारसंघात 76, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात 73.01 असे अंदाजे एकूण 70.32 टक्के सरासरी मतदान झाले.
Nagpur Central : भाजपचे आमदार प्रविण दटकेंना काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेरले
रांगेत लागून मतदान
लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणूकीत मतदान करताना बुलढाणा जिल्ह्यातील मतदारसंघात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. मतदारसंघात उत्सवात मतदारराजाने सक्रीय सहभाग घेत मतदान केले. मतदानाला ग्रामीण भागात तर शहरी भागातही मतदारांनी घराबाहेर पडून मतदानासाठी रांगा लावत भरभरुन प्रतिसाद मिळाला. मतदारा ने मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा मतदान जास्त प्रमाणात करुन प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली. दिलेल्या या प्रतिसादामुळे जिल्ह्यात उत्साहात मतदान पार पडले. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रशासकीय इमारतीमधील जिल्हा माहिती कार्यालयाच्या मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. येथील मतदान केंद्रावरील सोई सुविधाविषयी माहिती जाणून घेतली.