Voting News : दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी बुलढाणा लोकसभेसाठी मतदान पार पडले. मतदानानंतर ईव्हीएम मशिन्स स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. आता तब्बल 32 दिवसांनंतर मतदानात वाढ झाली आहे. जळगाव जामोद मतदार संघातील मारोड गावातील केंद्रावरील ईव्हीएम मशीनची गडबड समोर आली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मारोड मतदान केंद्रावर एकूण मतदानात 50 जणांचे अधिकचे मतदान समाविष्ट झाल्याचे निदर्शनास आले आहे. हे मतदान कोणी केले? अशी शंका उपस्थित होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी नुकताच आढावा घेतला. 4 जूनला होणार्या मतमोजणी संदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना त्यांनी सूचना केली. त्यावेळी मारोड मतदान केंद्रासंदर्भात घडलेली बाब त्यांनी राजकीय पक्षांच्या निदर्शनास आणून दिली.
नेमके काय घडले?
मतदानाच्या दिवशी नियमानुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर सकाळी 6 वाजता मॉक पोलिंग (प्रारुप मतदान) घेण्यात येते. त्यानंतर कंट्रोल युनिटवरील क्लोज रिजल्ट क्लिअर केला जातो. नंतर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होत असते. प्राप्त माहितीनुसार मारोड मतदान केंद्रावर मॉक पोलिंग क्लिअर न करताच मतदान घेण्यात आले. हे मतदान मूळ मतदानात समाविष्ट करण्यात आले आहे. संपूर्ण मतदान मोजणी झाल्यानंतरच सर्वांत शेवटी मारोड येथील मतांची गणना होणार आहे.
याआधी नागपूर मध्येही अशाच प्रकारची घटना घडली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले असताना असे प्रकार घडणे योग्य नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
बुलढाणा लोकसभा मतदार संघामध्ये एकूण मतदार 17 लाख 82 हजार 700 आहेत. 11 लाख 05 हजार 612 जणांनी मतदान केले आहे. एकूण पुरुष मतदार संख्या ही 9 लाख 33 हजार 173 आहे. 6 लाख 03 हजार 525 पुरुषांनी मतदान केले आहे. एकूण महिला मतदार 8 लाख 49 हजार 503 आहेत. त्यापैकी 5 लाख 02 हजार 226 महिलांनी मतदान केले आहे. एकूण मतदान हे 62.03 टक्के आहे. अशात आता 50 मते जास्त भरल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.