BJP : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी रविवारी जाहीर केली. मात्र, पूर्व विदर्भातील 32 पैकी 17 जागा अद्यापही ‘होल्ड’वर आहेत. यात भाजपचे किती उमेदवार असतील, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे विद्यमान आमदार असलेल्या आर्वी, मध्य नागपूर व गडचिरोलीतील उमेदवारांची पक्षाने घोषणा न केल्याने तेथे उमेदवार बदलणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर हे जिल्हे मिळून विधानसभेच्या 32 जागा आहेत. शिंदे सेनेकडून रामटेकसाठी आशिष जयस्वाल यांचे नाव अगोदरच घोषित झाले आहे. रविवारी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत भाजपने 14 जागांवर उमेदवार जाहीर केले. देवळी, हिंगणघाट, वर्धा, हिंगणा, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर दक्षिण-पश्चिम, कामठी, तिरोडा, गोंदिया, आमगाव, आरमोरी, बल्लारपूर, चिमूर यांचा समावेश आहे. यात बहुतांश विद्यमान आमदारच आहेत. मात्र, गडचिरोलीत देवराव होळी, मध्य नागपूरचे विकास कुंभारे व आर्वी येथील दादाराव केचे या आमदारांच्या जागांबाबत कुठलीही घोषणा झाली नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
या जागांबाबत केंद्रीय पातळीवरून झालेल्या सर्वेक्षणाच्या आधारे दुसऱ्या यादीत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे भाजपला दुसरी यादी जाहीर करण्यासाठी फारसा वेळ उरलेला नाही. त्यामुळे सोमवार किंवा मंगळवारीच भाजपला निर्णय घेऊन यादी जाहीर करावी लागणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जागांचा प्रश्न आहे. विशेषतः शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या दाव्यामुळे काही ठिकाणी पेच निर्माण झाला आहे. परंतु, आर्वी, मध्य नागपूर आणि गडचिरोलीचे उमेदवार का घोषित केले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मध्य नागपूरप्रमाणे गडचिरोली आणि आर्वीतही काहीतरी वेगळं प्लानिंग नेत्यांच्या डोक्यात असल्याचे बोलले जात आहे.
साकोलीच्या उमेदवारीकडे लक्ष
भंडारा जिल्ह्यातील एकाही जागेवर उमेदवारी जाहीर झालेली नाही. विशेषत: साकोली येथील जागेकडे महायुतीचे विशेष लक्ष आहे. येथून काँग्रेसचे नाना पटोले यांना परत उमेदवारी मिळण्याचीच दाट शक्यता आहे. पटोले यांच्याविरोधात भाजपने तयारी चालविली होती व डॉ. सोमदत्त करंजेकर, बाळा काशीवार आणि एका जिल्हा परिषद सदस्याच्या नावाची चर्चा आहे. मात्र, या जागेवरून राष्ट्रवादीने देखील लढण्याची देखील इच्छा दर्शविली आहे. त्यामुळे येथे तिकीट कोणाला जाणार, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.