People Died : बुलढाणा जिल्ह्यातील चार तालुक्यातून जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्गाचा 11 डिसेंबर 2024 ला दुसरा वाढदिवस पार पडला! शिवसेनेतील महाबंडानंतर उद्धव सरकार गडगडले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी समृद्धी मार्ग पूर्ण झाला नसतानाही 11 डिसेंबर रोजी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ झाला. एकूण 701 किलोमीटर लांबीच्या या मार्गावरील नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटर चा मार्ग सेवेत रुजू झाला आहे. पाहतापहाता याला दोन वर्षे झाले असून समृद्धी ने तिसऱ्या वर्षांत पदार्पण केले आहे.
सुरुवातीपासून लहान मोठया अपघातासाठी गाजणाऱ्या आणि वादग्रस्त ठरलेल्या या मार्गावर डिसेंबर 2022 ते डिसेंबर 2024 दरम्यान 140 वाहन अपघातांची नोंद झाली आहे. यात 233 प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे. काही अपघातात बळींची संख्या लक्षणीय ठरली. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात झालेल्या लक्झरी अपघातात तब्बल 25 प्रवासी जळून कोळसा झाले होते. हा भीषण अपघात बुलढाणा जिल्हाच नव्हे राज्याला हादरविणारा ठरला होता. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, मेहकर आणि लोणार या चार तालुक्यातून हा मार्ग जातो.या टप्प्यात मोठ्या संख्येने लहान ,मध्यम आणि मोठे अपघात झाले आहे.
1102 कोटींचा महसूल
समृद्धी महामार्गामुळे शासनाला आतापर्यंत 1102 कोटींचा महसूल ही मिळाला असून जवळपास 8 कोटी प्रवाशांनी यावरून प्रवास केलाय. या महामार्गामुळे नागपूरसह विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक शहरे , धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे मुंबई जवळ आली आहेत. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुकर झालाय. एकंदरीत समृद्धीमुळे विदर्भासह मराठवाडा या भागाचा विकास ही होण्यास सुरुवात झाली आहे. आजवरच्या दोन वर्षांच्या कालावधीत समृद्धी महामार्गावर वाहनांची (वाहतुकीची) देखील समृद्धी राहिली आहे. या कालावधीत समृद्धी महा मार्गवरून 1 कोटी 52 लाख वाहनांची वाहतूक झाली आहे. यात 1 कोटी 5 लाख हलकी वाहने, पाच लाखांवर व्यावसायिक हलकी वाहने आणि 42 लाखांवर अवजड वाहनांचा समावेश आहे.