Political News : नागपूर. पूर्व विदर्भात पाच लोकसभा मतदारसंघ आहेत. या पाच लोकसभेत एकूण 28 विधानसभा मतदार संघ आहेत. यातील 14 जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दावेदारी करण्यात आली आहेत. शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क नेता म्हणून भास्कर जाधव यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी विधानसभा क्षेत्राच्या दृष्टीने आढावा घेण्यासाठी विदर्भात आलेले आहेत. या अनुषंगाने पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
ते म्हणाले, 14 जागा काम करण्यासाठी आम्हाला मोकळ्या झालेल्या आहेत. त्या 14 जागांचा आढावा घेण्याचे काम आम्ही करत आहोत. काही जागा आदलाबदल करून तिथे सक्षम उमेदवार आहेत का, याची चाचपणी केली जात आहेत. संभाव्य उमेदवार, इच्छूक उमेदवार यांची माहिती गोळा करून त्याचा अभ्यास आणि अहवाल तयार करून उद्धव ठाकरे यांना सोपवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सहा महिन्यापूर्वीच पूर्व विदर्भाची जबाबदारी आली. पारंपरिक रामटेक लोकसभा मतदारसंघाची जागा आमच्याकडे रहावी यासाठी आम्ही प्रयत्न केला. पण ती महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसला गेली, असेही भास्कर जाधव म्हणाले.
नागपुरातील सहा विधानसभांवरही दावा
भास्कर जाधव यांनी नागपूर शहर आणि ग्रामीणमधील जागांवरही दावा केला आहे. नागपूर शहरातील पूर्व, दक्षिण आणि मध्य नागपूर तर नागपूर ग्रामीणमध्ये हिंगणा, रामटेक, कामठी, उमरेड या जागांवर लढण्याचा विचार केला जात आहे. सहापैकी दोन जागेवर काँग्रेस निवडून आले, त्यामुळे उर्वरित जागेवर आम्ही क्लेम करणार आहोत, असेही ते म्हणाले.
महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट यांचेकडून नेहमीच भाजपवर हल्लाबोल केला जातो. यासंदर्भात बोलताना भास्कर जाधव म्हणाले, संजय शिरसाट जे बोलतात ते भाजपला सहन होत नाही. कारण भाजपला स्वतःला मोठे व्हायचे असते. 35 वर्ष शिवसेनेने ज्यांच्यासोबत मैत्री निभवली भाजपने त्यांनाच संपवण्याचा घाट घातला. या विचारांचे आणि दृष्टीचे फळ आज ते भोगत आहे, असा टोलाही जाधवांनी लगावला.
मित्रपक्षांचे उमेदवार पाडण्यात भाजपचा हातखंडा
1990 ला शिवसेनेने पहिल्यांदा मुंबईच्या बाहेर निवडणूक लढली. त्यावेळी सर्वात जास्त आमदार हे शिवसेनेचे निवडून आले होते, भाजपचे नाही. हळुहळू भाजपने मैत्रीच्या नावाखाली शिवसेनेचे उमेदवार पडण्याचे काम केले. यात भाजपाचा हातखंडा आहे, हे त्यावेळी आमच्या लक्षात आले नाही. शिवसेना आपले पूर्वीचे वैभव लवकरच मिळवेल, असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांनी युतीमधून बाहेर पडून भाजपला धडा शिकवला. 48 ही उमेदवार माझे आहेत, अशा भावनेने ते लढले. त्यामुळेच त्यांनी पारिजाताचे झाड फुलवले आणि वाढवले. त्याची फुले दुसऱ्याच्या दारात पडले तरी मला दुःख नाही तर आनंद आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्रणिती शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपावर जाधव यांनी संमिश्र प्रतिक्रीया दिली.
बावनकुळेंना मोदींच्या योजना तरी माहित आहेत का?
चंद्रशेखर बावनकुळे यांना मोदींच्या योजना तरी माहिती आहेत का?, असा घणाघाती सवालही भास्कर जाधव यांनी केला. लोकांना 15 लाख देऊ असे म्हणाले. ही योजना आम्ही बंद पाडली नाही, गॅस सिलेंडर स्वस्त करू, हे आम्ही बंद पाडले नाही. 2022 पर्यंत प्रत्येकाच्या डोक्यावर छत येईल, ही योजना आम्ही बंद पाडली नाही, असा टोला लावतानाच त्यांनी नरेंद्र मोदींना फक्त विरोधकांवर टिका करण्याचेच काम असल्याचा आरोप केला. शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी भाजपला सळो की पडो करून सोडल्याचेही जाधव म्हणाले.
रामटेकची जागा शिवसेनेकडे राहिल
महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेने आघाडी धर्म पाळला. हे सांगताना भास्कर जाधव यांनी शिवसेनेने सोडलेल्या जागांचा पाढा वाचला. लोकसभेमध्ये पाच वेळा निवडून आलेली पारंपरिक जागा आम्ही सोडली, कोल्हापूर, अमरावतीची जागा सोडली. या सर्व जागांची नोंद महाराष्ट्राच्या जनतेकडे आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे सुद्धा आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. रामटेकची जागा आम्ही निवडून आणलेली आहे, ती आमच्याकडेच राहील, असा दावाही जाधवांनी केला.